बेरोजगारीवर उपाय शिवसेना शिवात्र
नागपूर मुंबईतील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेने 'शिव वडापाव' योजना आणली. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना उत्तम रोजगार देण्यासोबतच शेतक-यांचे भले करण्यासाठी शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात ‘शिवान्न’ योजना घेऊन येत असल्याची माहिती शिवसेनेच्या शिवउद्योग सहकार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हर्षद नेगिनहाळ यांनी ‘दिव्य मराठी'ला दिली. या योजनेअंतर्गत फिरते उपाहारगृह, पोळीभाजी केंद्र तसेच झुणका-भाकर केंद्र सुरु करण्यात येईल. याशिवाय बचत गट निर्मित खाद्यपदार्थ, फळप्रक्रिया उद्योग, खाद्यपदार्थ उत्पादकांसाठी बाजारपेठही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद व अमरावती या सहा मोठ्या शहरांत एक सेंट्रल किचन तयार केले जाणार आहे. या मध्यवर्ती स्वयंपाकघरासाठी लागणारा भाजीपाला थेट स्थानिक शेतक-यांकडून विकत घेण्यात येईल. त्यानंतर मध्यवर्ती स्वयंपाकघरात पोळी-भाजी, नाश्ता तसेच झुणकाभाकर तयार करण्यात येऊन सुशिक्षित बेरोजगारांना विक्रीसाठी देण्यात येईल. यात शेतक-यांच्या मुलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शहरातील गर्दी व मोक्याच्या ठिकाणी या गाड्या उभ्या राहतील, या उपक्रमात सहभागासाठी उमेदवारांची प्रथम मुलाखत घेण्यात येणार आहे. मुलाखतीमध्ये उत्तीर्ण पात्र उमेदवारांची निवड झाल्यावर त्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर त्यांना कर्ज घेण्यासाठी आवश्यक ती मदत व मार्गदर्शन शिवउद्योग सेनेतर्फे करण्यात येईल. यात शेतक-यांच्या मुलांना प्राधान्य मिळेल. असे, नेगिनहाळ यांनी सांगितले. याशिवाय मुंबई व पुण्यासाठी इतर विभागातील शेतक-यांचा सेंद्रिय ‘भाजीपाला जादा भाव देऊन विकत घेण्यात येईल, अशी माहिती कोपरगाव येथील कृषी विकास तज्ज्ञ सतीश नेने यांनी दिली. संपूर्ण महाराष्ट्रात शेतक-यांचे नेटवर्क उभारण्याची जबाबदारी सेनेने नेने यांच्यावर दिली आहे.
Comments
Post a Comment